
बनावट आयुर्वेदिक औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोघास दोन वर्षे शिक्षा, 50 हजरांचा दंड ठोठावला ; जालना जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल..
जालना- बनावट आयुर्वेदिक औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोघांना दोन वर्षे शिक्षा व 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 सप्टेंबर 2016 रोजी पोलिसांनी न्यायालयात आयपीसी खाली दाखल केलेल्या या खटल्याचा निकाल जालना जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे, की जालना येथील श्रीहरी आयुर्वेदिक औषधी भांडार, भारत माता मंदीर जवळ, अमर टॉकीज, शिवाजी पुतळा रोड, जालना या पेढीमध्ये बनावट आयुर्वेदिक औषधांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दि. 3 जुलै 2015 रोजी अन्न व औषध प्रशासन जालना येथील कार्यरत तत्कालीन औषध निरीक्षक राजगोपाल बजाज याना मिळाली होती. त्यानंतर औषध निरीक्षक बजाज यानी भेट देउन पाहणी केली असता या दुकानात इतर आयुर्वेदिक औषधा समवेत बाबा जॉईन्टेक्स टॅब्लेटस उत्पादक बाबा आयुर्वेदिक फार्मसी गंगानगर, स्वस्तीक जॉईनक्युअर ( विथ गोल्ड) कॅप्सुल व स्वस्तीक कर्मयोगी ( विथ गोल्ड) कॅप्सुल दोन्हीचे उत्पादक के. डी. आर्या फार्मा युनीट 2 पल्लकड केरळा हि औषधी विक्रीसाठी साठवुन ठेवल्याचे आढळुन आले.
औषधी हि संधिवात, गुडघे दुखी, कंबर दुखी, आदी वात विकारावर गुणकारी असल्याचे त्यावर नमुद होते. औषध निरीक्षक श्री. बजाज यांनी या औषधांचे अरूण सुरासे यांच्याकडुन नियमानुसार नमुने विश्लेषणासाठी काढुन उर्वरीत साठा विक्री व वापरासाठी प्रतिबंधित केला होता. सदर औषधी नमुने शासकीय विश्लेषक औषध नियंत्रण प्रयोगशाळा औरंगाबाद येथे विश्लेषणा करीता पाठवले असता शासकीय विश्लेषक, औरंगाबाद यांनी त्यांचे नमुना 13 ओ मधील अहवालानुसार बाबा जॉईन्टेक्स या औषधामध्ये ऍलोपॅथीक औषधी डायक्लोफेनॅक सोडीयम, स्वस्तीक जॉईनक्युअर ( विथ गोल्ड) कॅप्सुल मध्ये ऍलोपॅथीक औषधी डायक्लोफेनॅक सोडीयम, पॅरॉसिटॉमॉल व निमेसुलाईड आणि स्वस्तीक कर्मयोगी ( विथ गोल्ड) कॅप्सुल मध्ये ऍलोपॅथीक औषधी पॅरॉसिटॉमॉल व सिल्डेनॅफिल सायट्रेट या औषधांचे मिश्रण केलेले असल्याने ती बनावट असल्याचे घोषित केले होते.
दि. 8 सप्टेंबर 2015 रोजी बजाज यानी प्रतिबंधीत केलेला बनावट आयुर्वेदिक औषधाचा साठा जप्त करून सदर बनावट आयुर्वेदिक औषधी कोणाकडुन खरेदी केली. या बाबत औषध निरीक्षक श्री बजाज यांनी श्रीहरी आयुर्वेदिक औषधी भांडारचे मालक श्रीकृष्ण मुजमुले यांच्याकडे विचारणा केली असता त्या बाबत त्यांनी कोणतीही माहिती तसेच सदर औषधांचे खरेदी बिल सादर न केल्यामुळे श्री बजाज यांनी सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी दि. 16 सप्टेंबर 2016 रोजी मा. न्यायालयात आयपीसी खाली स्पेशल खटला क्र. 178 / 2020 तसेच औषध निरीक्षक श्रीमती मिटकर यानी औषधी व सौंदर्य प्रसाधने खाली स्पेशल खटला क्र. 265 / 2022 दाखल केलेला होता.
या खटल्याची सुनावनी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर एम. जैस्वाल यांच्या समोर झाली. या खटल्यामध्ये आरोपी अरूण सुरासे व कृष्णा मुजमुले या दोघांनाही कलम 235 (2) च्या तरतुदींनुसार दोषी ठरविले. अंमली पदार्थ आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी आणि त्याद्वारे प्रत्येकास दोन वर्षांच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि त्यांना रु. 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
प्रत्येकी, सीआर. पीसी च्या कलम 235 (2) च्या तरतुदींनुसार पुढे दोषी ठरविण्यात आले. आयपीसीच्या कलम 34 सह वाचलेल्या कलम 274 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी आणि त्याद्वारे प्रत्येकाला तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि त्यांना प्रत्येकी रु. 1 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच कलम 235 (2) च्या तरतुदींनुसार दोषी ठरवले जाईल. सीआरपीसी. आयपीसीच्याच्या कलम 34 सह वाचलेल्या कलम 275 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी आणि त्याद्वारे प्रत्येकाला तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि त्यांना 1 हजार रुपये प्रत्येकी दंड आकारल्या जाणार आहे.
अशी शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्यामध्ये जिल्हा सहायक सरकारी अभीयोक्ता ऍड. ओ. डी. मते यांनी तर आरोपी तर्फे ऍड. पि. डब्ल्यु. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
