रोटरीने सीना नदी पुलावर संरक्षक जाळ्या बसवून केले सुशोभीकरण

नदीत कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार-जिल्हाधिकारी


जालना/प्रतिनिधी -जालना शहरातील सीना नदीत टाकण्यात येणारा कचरा नियंत्रित करण्यासह नदी परिसराचे सुशोभीकरण व्हावे, या पर्यावरण अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पात रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने गोल्डन जुबली परिसरातील सीना नदीवरील पुलास संरक्षक जाळी बसवण्यात येऊन थाडेश्वर मंदिरलगत नदीकिनारी फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हा लोकार्पण सोहळा दि. 18 ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जालना महापालिकेचे प्रशासक संतोष खांडेकर, उद्योजक घनश्याम गोयल,अरुण अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रकल्प प्रमुख किशोर देशपांडे यांनी संरक्षण जाळी बसवण्याचा उद्देश व जालना शहरातील नद्यांची स्वच्छता, रोटरी क्लब करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. क्लबचे अध्यक्ष डॉ. विजय जेथलिया यांनी स्वागतपर भाषण केले. सुनील रायठठ्ठा यांनी लोकसहभागातून जालना शहरात होणाऱ्या कार्याबद्दल माहिती दिली. महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी पालिकेच्या माध्यमातून शहराची स्वच्छता व सुशोभीकरण योजना राबविली जाणार असल्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी नदीचे महत्त्व, संस्कृती व त्याचे जतन याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करीत पर्यावरण दूषित होणार नाही, यासाठी शासन विविध कार्य करणार आहे. नदीमध्ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही विविध ठिकाणी लावण्यात येतील, असे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन किशोर देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत महाजन यांनी केले. हा प्रकल्प राबविण्यासाठी रोटरी क्लबसह कुंडलिका सीना पुनर्जीवन प्रकल्पातील सर्व कार्यकर्ते विशेषतः उदय शिंदे, सुनील रायठठ्ठा व सुरेश केसापूरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ जालनाचे हेमंत ठक्कर, विनोद मोतीवाला, अकलंक मिश्रिकोटकर, दिपक बगडीया, रवी भक्कड, सचिन वाणी, सुरेश अग्रवाल, प्रमोद झांजरी, शिवरतन मुंदडा, अरुण मोहता, गोपाल मानधनी आदी उपस्थित होते. नदीमध्ये कोणीही कचरा टाकू नये नदी स्वच्छ ठेवावी असा संदेश या प्रकल्पाद्वारे देण्यात येत आहे.