शहरातील फुले मार्केट परिसरातील दोन दुकानाला भीषण आग

आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक.

जालना- शहरातील नवा जालना परिसरातील फुले मार्केटमध्ये असलेल्या तेलाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारस घडली आहे. दुकानाच्या मागच्या बाजूने ही आग लागल्याने दुकानातून धूर निघत असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान दुकानात गेलेल्या विजेच्या सर्व्हिस केबलमध्ये शॉट सर्किट झाल्याने आग अधिकच वाढली. दरम्यान, नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तास अथक परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली आहे.

महात्मा फुले मार्केटमध्ये अतुल चौडींये यांचे पानमटेरीयलचे तसेच ओमप्रकाश नरवय्यै यांचे तेल विक्रीचे दुकान आहे. याच दुकानास शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग वाढत गेल्याने गणेशलाल चौंडीये यांचे गोदामही आगीमुळे जळाले. आगीची घटना कळताच अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, त्यांचे सहकारी संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे,विठ्ठल कांबळे, सादत अली, किशोर सगट, विनायक चव्हाण आदींनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलवार, पोलीस उपनिरीक्षक उद्धव चव्हाण, भगवान नरोडे,राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, भरत ढाकणे, एस. जी. जाधव, भरत आगळे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केले. आगीत खाद्यतेलाच्या होलसेल दुकानासह पान मसालाच्या दुकानही जळून खाक झाल्याने अंदाजे 5 ते 6 लाखाचे नुकसान झाले असल्याचं दोन्ही दुकान मालकांनी सांगितले आहे. ही आग लागल्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.