रुग्णालयाच्या नर्स रूममध्ये घुसून रुग्णाच्या नातेवाईकाचं धक्कादायक कृत्य; डॉक्टरांसह कर्मचारी संतप्त

जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकाने नर्सरुममध्ये घुसून नर्सचा हात पकडून शिवीगाळ केली आहे.

जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाईकाने नर्सरुममध्ये घुसून नर्सचा हात पकडून शिवीगाळ केली आहे. इतकंच नाही, तर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या रुग्णालयातील इतर महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याने दमदाटी केली. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला आहे.

या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी कामबंद आंदोलनाला देखील सुरूवात केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून दमदाटी करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यानी केली आहे.

जिल्हा रुग्णालयातील एका नर्सने दिलेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाकडून या रुग्णाला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी देखील घेतली जात होती. मात्र, या रुग्णाच्या चार ते पाच नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन राडा घातला.

आमच्या रुग्णाला योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. इतकंच नाही, तर रुग्णालयातील नर्सरूममध्ये घुसून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच त्यांनी महिला कर्मचाऱ्याचा हात देखील पकडला असल्याचा आरोप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे या नातेवाईकांवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनामुळे इतर रुग्णाच्या उपचारावर यांचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. जोपर्यंत या शिविगाळ करणाऱ्या नातेवाईंकावर कारवाई केल्या जात नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका रुग्णालयातील डॉक्टर सर कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.