राज्यस्तरीय कबड्डीत पुरुष गटात औरंगाबाद तर महिलात नगरने पटकावले विजेतेपद
……………
जालन्यात सलग 3 वर्ष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कटिबद्ध- आ. राजेश राठोड
………………

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम निकाल

महिला गट – स्व. मारोतराव घुले प्रतिष्ठान दहिगव्हाण (विजेता), मानवत क्रीडा अकॅडमी मानवत (उपविजेता), राजमुद्रा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर (तृतीय), क्रीडा प्रबोधिनी मंडळ जालना (चतुर्थ). वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट पकड- राणी भुजंग, उत्कृष्ट चढाई – वैशाली मोहिते गोषेगाव, सर्वोत्कृष्ट खेळाडू- गौरी दहे मानवत.
पुरुष गट : भारत माता क्रीडा मंडळ औरंगाबाद (विजेता), शिवम क्रीडा मंडळ पैठण (उपविजेता), डॉ. नारायणराव मुंढे क्रीडा मंडळ जालना (तृतीय), जगदंबा क्रीडा मंडळ खोराडसावंगी (चतुर्थ). वैयक्तिक पारितोषकांमध्ये उत्कृष्ट पकड- योगेश चव्हाण जालना, उत्कृष्ट चढाई- शुभम वैजनाथ गोल्डे पैठण, सर्वोत्कृष्ट खेळाडू – कृष्णा राठोड.

जालना/प्रतिनिधी– महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या जिजाऊ कबड्डी चषक-2023 या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद औरंगाबाद येथील भारतमाता क्रीडा मंडळाने तर महिला गटाचे विजेतेपद अहमदनगर जिल्ह्यातील दहीगव्हाण येथील स्व. मारोतराव घुले प्रतिष्ठानने पटकावले.

दोन्ही गटातील अंतिम सामने अत्यंत अटीतटीचे आणि चित्तथरारक झाले. महिलांच्या गटात सावित्रीच्या लेकीतील अंतिम झुंज हृदयाचा ठोका चुकविणारी ठरली. सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांना 5 चढाईची संधी देण्यात आली, त्यात स्व. मारोतराव घुले प्रतिष्ठानने बाजी मारली. मान्यवरांच्याहस्ते दोन्ही गटातील विजेत्या संघाला 31 हजार, उपविजेत्या संघाला 21 हजार, तृतीय संघाला 11 हजार तर चतुर्थ संघाला 7100 रुपयाचे बक्षीस व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आ. राजेश राठोड हे होते. विशेष अतिथी म्हणून देशातील प्रथम मंडळ स्तंभनिर्माते तथा माजी आमदार डॉ. नारायणराव मुंढे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा कबड्डीत महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेखाताई नागरगोजे-धस, छत्रपती पुरस्कार विजेते तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमाताई पायगव्हाणे, सौ. मनीषाताई काटकर ह्या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर चषकाचे मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंढे, सुघोष मुंढे, संयोजन समितीचे सुदामराव सदाशिवे, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, आश्लेषा इंग्लिश स्कूलच्या संचालिका शुभदा मुंढे आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात आ. राजेश राठोड म्हणाले की, मी खेळ टीव्हीवर बघायचो. मात्र, प्रा. सत्संग मुंढे यांनी कबड्डी हा खेळ डोळ्याने पाहण्याची संधी प्रत्यक्ष उपलब्ध करून दिली आणि मी धन्य झालो. या चषकाचे नियोजन अत्यंत सुरेख करण्यात आले होते. तालुका, राज्य व देश पातळीवर कबड्डीचा विकास आणि प्रसिद्धीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून, पुढील सलग तीन वर्ष म्हणजेच सन 2026 पर्यंत दरवर्षी राज्यस्तरीय आणि देशपातळीवर स्पर्धा आयोजनासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रथमच राज्यस्तरावर आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या यशाचे श्रेय राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या स्टाफला जाते तर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची जबाबदारी मी स्वीकारतो, या प्रा. सत्संग मुंढे यांच्या प्रास्तावकातील विधानाच्या अनुषंगाने बोलताना भगवान शिवशंकरानंतर विष पचविण्याची ताकद मी सत्संग मुंढे यांच्यात बघितली, असे गौरवोद्गार आ. राठोड यांनी काढले.

भास्करराव आंबेकर म्हणाले की, कबड्डीतील अटीतटीचे सामने बघून डोळ्याचे पारणे फिटले. समारोप अत्यंत रोमहर्षक झाला. महिला गटात जिजाऊच्या लेकींनी तगडी झुंज दिली. संयोजकांनी माजी खेळाडूंचा सत्कार केल्याने त्यांनाही धन्य वाटले असेल. खिळाडूवृत्ती ही मानसिकता असते. जिंकणाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करावा आणि पराजितांनी पुढची तयारी करावी, असे सांगून, विजयासाठी घामच गाळावा लागतोच, असे सांगत या चषकाच्या माध्यमातून खेळाडू देशपातळीवर जालन्याचा नावलौकिक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरेखा नागरगोजे म्हणाल्या की, दोन्ही गटातील अंतिम सामन्यातून कबड्डीचा दर्जा आणि गुणवत्ता दिसून आली. मीदेखील कबड्डीच्या राष्ट्रीय संघात वरिष्ठ गटात मराठवाड्यातून एकमेव पाच वर्ष खेळले. सन 1989 ते 1999 पर्यंत फक्त आणि फक्त कबड्डी म्हणून जगत होते. तुम्हाला पाहून आणखी कबड्डीसाठी काही करावे असे वाटते. पालकांनी आवड पाहून आपल्या पाल्यांना प्रोत्साहन दिले तरच ते घडतील, असे त्यांनी सांगितले.

मंगल पांडे म्हणाले की, संयोजकांनी माजी खेळाडूंना बोलावून सत्कार केला ही संकल्पना आपणास आवडली आहे. प्रामाणिक इच्छा व झोकून देण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते. प्रा. सत्संग मुंढे हे दोन वर्षापासून राज्यस्तरीय चषकासाठी आपल्याशी संपर्क साधून होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करून दाखविल्याने जालन्यात कबड्डीला नक्कीच सोनेरी दिवस येतील. आता त्यांनी किशोर/ कुमार गटासाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धा घ्यावी. आम्ही त्यांना खंबीर साथ देऊ, अशी ग्वाही मंगल पांडे यांनी दिली. जिंकले त्यांचे अभिनंदन करतो आणि पराजित झालेल्यांनी चांगल्या खेळाडूंकडून चांगल्या गोष्टी, कौशल्य आत्मसात करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

प्रास्ताविकपर भाषणात मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंडे म्हणाले की, पहिल्यांदाच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. कबड्डीचा इतिहास पाहता जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची माहिती नव्हती. अशावेळी आयोजनात पंजाबराव वाघ हे दुवा जोडणारे ठरले. त्यांच्याकडून बारकावे शिकलो. हे यश महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहे. यापुढेही राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी आ. राजेश राठोड हे पाठीशी राहतील, असा विश्वास व्यक्त करून पुढील वर्षी जिजाऊ जयंतीपासून म्हणजेच 12 ते 14 जानेवारीपर्यंत राज्यस्तरीय जिजाऊ कबड्डी चषक आयोजित केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या स्पर्धेत सुंदर चढाया आणि पकडी अनुभवण्यास मिळाल्या, क्रिकेटपेक्षा जास्त चित्तथरारक, उत्कंठा वाढविणारी खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली, असे ते म्हणाले. जालना जिल्ह्यातील कबड्डीबाबत नविन पिढीला प्रेरणा व खरा इतिहास माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे आज प्रकाशन करण्यात आले असून, त्यात प्रतिभावंत माजी खेळाडू, त्यांनी गाजवलेले मैदान, त्यांना मिळालेली पारितोषिके, त्यांनी वाढवलेला जिल्ह्याचा नावलौकिक त्यात अधोरेखित करण्यात आलेला आहे. ही स्मरणिका नवोदित खेळाडू आणि कबड्डी या खेळात पारंगत होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऊर्जास्त्रोत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी विजेते, उपविजेते, तृतीय, चतुर्थ संघ आणि उत्कृष्ट खेळी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जालना जिल्ह्यात कबड्डी रुजविण्यासह टिकविण्यासाठी झटणारे खेळाडू, सामन्याचे पंच, गुणलेखक यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील कबड्डी रसिक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लहुजी दरगुडे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके यांनी मानले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, स्पर्धा समन्वयक राजाभाऊ थोरात, पंजाबराव वाघ, संतोष नागवे, संयोजन समितीचे विजय कामड, अब्दुल हाफिज, सुदामराव सदाशिवे, बाबुराव सतकर, सुभाष कोळकर, नारायण चाळगे, देवराव सोनवणे, ओमप्रकाश चितळकर, नवाब डांगे, वैजनाथराव चंद, अनिकेत मुंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.