राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत होताहेत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढती
……………
आज समारोप : आ. राजेश राठोड, आ. टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राठोड, पोलीस अधिक्षक डॉ. शिंदे यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण
…………….

जालना/प्रतिनिधी– महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या जिजाऊ कबड्डी चषक-2023 या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गेल्या दोन दिवसापासून चित्तथरारक आणि जालनेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढती होत आहेत.

आज शनिवारी दुसऱ्या दिवशी पुरुष आणि महिला गटाच्या लढती अत्यंत रंगतदार झाल्या. रविवारी सायंकाळी 4.30 पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी कबड्डी खेळाला जालना देण्यासह तो टिकवण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक प्रा. सत्संग मुंढे यांनी केले आहे.
आज शनिवारी महिला गटात झालेल्या लढतीत मानवत स्पोर्ट अकॅडमीने सत्यशोधक क्रीडा संघ गोसेगावचा पराभव केला. राजमुद्रा क्रीडा मंडळ संभाजीनगर विरुद्ध सत्यशोधक विद्यालय गोषेगाव यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. महिला गटातील मारोतराव घुले विद्यालय दहेगाव विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी जालना त्यांच्यातील सामना चुरशीचा ठरला.

पुरुष गटात राजमुद्रा क्रीडा मंडळ विरुद्ध डॉ. नारायणराव मुंडे क्रीडा मंडळ जालना, युवा पुरुष ढवळेश्वर विरुद्ध पैठण क्रीडा मंडळ पैठण यांच्यात लढती सुरू होत्या. सकाळच्या सत्रात क्रीडा प्रबोधनी जालना विरुद्ध एकता कबड्डी मंडळ पूर्णा यांच्यात रंगतदार लढत होऊन 13 गुणांनी क्रीडा प्रबोधिनीचा संघ विजयी झाला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. नारायणराव मुंढे, प्रा. सत्संग मुंढे, प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, प्रा डॉ. प्रताप रामपुरे, आश्लेषा फ्री इंग्लिश स्कूलच्या संचालिका शुभदा मुंढे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जायभाये, बी. के. कराड, डी. एल. पवार, डॉ. बप्पासाहेब मस्के, प्रा. डॉ. प्रमोद ढोकणे, दुपारच्या सत्रात बाबुराव सतकर, सुदामराव सदाशिवे, भगवानराव मुंढे, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, विजय कामड, मधुरा मुंढे, डॉ. भगवानसिंग डोभाळ, भारतीय जीवन विमा निगमचे पांडुरंग सांगळे, प्रायोजक म्हणून मदत करणारे नागरे मसालेवाले आदींची उपस्थिती होती.

रविवारी होणार समारोप –

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आ. राजेश राठोड हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. राजेश टोपे, विशेष अतिथी म्हणून देशातील प्रथम मंडळ स्तंभनिर्माते तथा माजी आमदार डॉ. नारायणराव मुंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा नागरगोजे- धस, उद्योजक घनश्यामदास गोयल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा राष्ट्रीय कबड्डीपटू किसनराव तारडे, मुंबईचे पोलीस निरीक्षक दुलबाजी ढाकणे, निवृत्त पोलीस अधिकारी तथा राष्ट्रीय कबड्डीपटू कृष्णाजी गायके तसेच जालना जिल्ह्यात कबड्डी रुजविण्यासह टिकण्यासाठी झटणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा महात्मा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंढे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके, संयोजन समितीचे विजय कामड, अब्दुल हाफिज, सुदामराव सदाशिवे, बाबुराव सतकर, सुभाष कोळकर, नारायण चाळगे, देवराव सोनवणे, ओमप्रकाश चितळकर, नवाब डांगे, वैजनाथराव चंद, अनिकेत मुंढे यांनी केले आहे.

कबड्डीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनते-प्रा.सत्संग मुंढे

यावेळी बोलताना मुख्य संयोजक प्रा.सत्संग मुंढे म्हणाले की, भारतीय मातीत उगम पावलेल्या कबड्डी या मैदानी खेळात जगभरात प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. सन 1938 पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. खेळ कोणताही असो त्यातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनते. त्यापैकीच कबड्डी हा असाच एक खेळ असून ज्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनते. निर्णय क्षमतेत वाढ होते आणि चतुराई निर्माण होते. सोशल मीडियात गुरफटलेली युवा पिढी मैदानाकडे वळावी आणि कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून, यातून निश्चितच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असे सांगून देशभरात जो प्रतिसाद आणि प्रसिद्धी क्रिकेट खेळायला मिळते तेवढीच कबड्डीला मिळावी, अशी अपेक्षा प्रा. मुंढे यांनी व्यक्त केली.