जालना कारखान्यातील कोट्यवधीच्या साहित्याच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करा, आ.कैलाश गोरंटयाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जालना(प्रतिनीधी)ईडीने जप्तीची कारवाई केलेल्या जालना सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतून समृध्दी मार्ग गेल्यास संपादीत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम संबधित कार्यालयाने ईडीने किंवा न्यायालयात जमा करावी अशी मागणी आ. कैलाश गोरंटयाल यांनी आज सोमवारी एका शिष्टमंडळासह जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

जालना तालुक्यातील रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखाना शेतकरी,कामगार आणि सभासद बचाव कृती समितीच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला भेट देऊन आ.गोरंटयाल यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा केली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची एका शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर बोलताना आ.कैलाश गोरंटयाल म्हणाले की,जालना सहकारी साखर कारखान्याची खरेदी ही खोटे नाटे कागदपत्र तयार करून करण्यात आली आहे.या कारखान्यातील कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या बॉयलरसह अन्य साहित्याची चोरी करून त्याची भंगारात विक्री करण्यात आली आहे.कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या साहित्याच्या चोरीचा तपास करून साहित्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.

जालना – नांदेड या प्रस्तावित करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गासाठी जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन संपादित करण्यात येऊ नये.जमीन संपादित करण्यात आल्यास सदर संपादीत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम संबधित शासकीय कार्यालयाने ईडीकडे किंवा न्यायालयात जमा करावी.आणि मोबदल्याची रक्कम अदा करायचीच असेल तर जालना सहकारी साखर कारखान्यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन संपादित करण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांसह कामगार आणि सभासद यांना वाटप करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

राज्य शासनाची दिशाभूल करून तसेच खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जालना कारखाना हडप करत या जागेचा सातबारा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्वतःच्या नावावर केला आहे.त्यामुळे मोबदल्याची रक्कम खोतकर यांना देण्यात येऊ नये. जालना – नांदेड या प्रस्तावित करण्यात आलेला  समृध्दी महामार्ग मॅनेज करून मुद्दाम जालना सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतून नेण्याचा घाट घातला जात असून समृध्दी महामार्गासाठी जमीन संपादित झाल्यास त्यातून मिळणार असलेल्या जवळपास शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यावर खोतकर यांचा डोळा असल्याचा आरोप आ.गोरंटयाल यांनी केला आहे.

जालना सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावात कारखाना बचावसाठी शेतकरी,कामगार आणि सभासद यांच्या लवकरच बैठका घेऊन जनजागरण करणार असल्याचे सांगून समृध्दी महामार्गावरील नाके आणि जालना कारखान्याच्या संपादीत जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेवर डोळा ठेवूनच खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचा आरोप आ.गोरंटयाल यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांना भेटलेल्या शिष्टमंडळात ज्ञानेश्वर भांदरगे,अंकुशराव देशमुख,अरुण पाटील वझरकर,लक्ष्मणराव राजे शिंदे,प्रल्हाद हेकाडे, भिकनराव पाटील गवारे,बाबासाहेब थिटे,काकासाहेब पाटील जऱ्हाड,सुधाकर पाटील जऱ्हाड,सुरेश बोरुडे,लक्ष्मणराव शिंदे,भगवानराव कठाळे,मदन एखंडे,शेख सलीम काझी,वसंतराव सहाणे,कारभारी महाराज अंभोरे,दिलीप मोरे आदींचा समावेश होता.