ग्रामीण भागात नेत्रचिकित्सेसाठी लॉयन्सची ऐतिहासिक कामगिरी!

लोकसहभागातून साकारले जातेय सर्व सुविधा युक्त नेञसेवा इस्पितळ

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यासह शेजारच्या चार जिल्ह्यांतील नेञ रुग्णांसाठी मागील सहा वर्षांपासून ( कोरोनाचा कालखंड वगळता) लॉयन्स क्लब तर्फे समर्पित भावनेने सुरू असलेला नेञचिकीत्सा प्रकल्प नेञ रूग्णांना संजीवनी देणारा ठरला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली नेञ रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच
लॉ. मनोहर खालापुरे यांच्या नेतृत्वात
लॉयन्स क्लब मार्फत तळागाळातील रूग्णांच्या सोईसाठी
परतुर येथे सर्व सुविधा युक्त नेञचिकीत्सा इस्पितळ उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया

जालना व परतुर लॉयन्स क्लब तर्फे सन 2016 पासून प्रत्येक महिन्यात चार नेञतपासणी शिबिरे घेतली जातात. कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वगळता आतापर्यंत घेण्यात आलेल्या 350 शिबिरांत 72 हजार गरजूंना लाभ झाला. सात वर्षात एकूण 13,500 मोतियाबिंदू बाधित रुग्ण आढळून आले. पैकी 13 हजार रूग्णांवर चिकलठाणा येथील लॉयन्सच्या नेत्रसेवा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.असे नमूद करत लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया म्हणाले, सतत सुरू असलेल्या नेत्र तपासणी शिबिरांत नियमितपणे 400 नेत्र बाधित रुग्ण तपासणीसाठी येतात. परतूरसह शेजारील जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन नेञ तपासणीसह डायलिसिसची सुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय अध्यक्ष लॉ. मनोहर खालापूरे,उपाध्यक्ष लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया, संचालक लॉ. शाम लोया, लॉ. अतुल लढ्ढा, लॉ. सुनील बियाणी, लॉ. प्रशांत राखे, लॉ. महेश होलाणी, लॉ. बबनराव उन्मुखे, लॉ. परमेश्वर राजबिंडे, लॉ. प्रविण जेथलिया, लॉ. भास्कर खोसे, यांच्या देखरेखीखाली
लोकसभागातून साकारले जात असून पुढील वर्षात नागरिकांना याचा मोठा लाभ होईल .असा विश्वास प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी व्यक्त केला.

गरजवंतांना दिव्य दृष्टी देण्यासाठी प्रयत्न: प्रांतपाल लॉ. जयपुरिया

साडेपाच हजार स्क्वेअर फुट मध्ये एकूण तीन मजली इमारतीचे काम करण्याचा आमचा मानस असून सध्या तळमजला व पहिल्या मजल्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. आगामी पाच महिन्यात सर्व शस्त्रक्रिया साहित्य, दोन नेत्ररोग तज्ञ व तेरा कर्मचारी , डायलिसिस अशी सर्व सुविधा युक्त यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. मोतीबिंदू, रेटिना, टेरिझम सह डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांवर येथे शस्त्रक्रिया होतील. असे सांगून तळागाळातील नागरिकांना महागड्या शस्त्रक्रिया अल्प दरात तर अत्यंत गरीब व गरजवंतांना मोफत शस्त्रक्रिया करून नवी दिव्यदृष्टी देण्याचा लॉयन्सचा प्रयत्न आहे अशी भूमिका प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी स्पष्ट केली.