*जांब समर्थ मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणी चार आरोपी अटकेत

*जांब समर्थ मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणी चार आरोपी अटकेत ; चौकशीतून उलगडणार घटनाक्रमाचे औत्सुक्य!*

     जालना, घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील अकरा मूर्ती चोरी प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने चार आरोपींना कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर आता, संपूर्ण राज्यभरात चर्चेत आलेल्या या प्रकरणात आरोपींनी केलेली चोरी व त्यानंतर दोन महिने मूर्त्यांना घेऊन केलेलें परराज्यापर्यंतचे भ्रमण हा औत्सुक्याचा घटनाक्रम पोलिस तपासातून समोर येणार आहे. याकडेही भाविकांचे लक्ष लागले आहे.               
समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या व त्यांच्या वंशपरंपरागत जतन करून ज्या श्रीराम मंदिरात श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. याच मूर्ती दि.22आंगस्ट रोजी रात्रीतून चोरट्यांनी लांबविल्या. दुस-या दिवशी पहाटे पुजारी धनंजय वसंतराव देशपांडे यांच्या लक्षात ही बाब आली, त्यांनी तात्काळ घनसावंगी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ गावांसह राज्यात भाविकांमध्ये संताप निर्माण झाला होता. घनसावंगी चे आमदार तथा माजी पालकमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या चोरीच्या घटनेचा मुद्दा मांडून तपास लवकर करण्याची मागणी केली. राज्याचे उपमुख्य मंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुन्हा उघडकीस आणण्याचे आश्वासन दिले.  इकडे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवून प्रमुख अधिका-यांसह स्वतः दोन, तीन वेळा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुभाष भूजंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकातील पाडसाळगी ता. आळंद,जि. गुलबर्गा हे ठिकाण गाठले व या गुन्ह्याचा छडा लावला. जिलानी सय्यद पाशा शेख यांच्यासह पाशामिया मसाकसाब शेख रा. भालकी,जि.बिदर यास ताब्यात घेऊन अन्य दोन आरोपींना ही अटक केली. आरोपींच्या ताब्यातून श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व शत्रुघ्न अशा पाच मूर्त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. यातील आरोपींची पोलिस कोठडी घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुभाष भूजंग,पोउपनि. गणेश राऊत, विनोद गडदे, जमादार कांबळे, कृष्णा तंगे, जगदीश बावणे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, देवीदास भोजने, भागवत खरात यांनी यशस्वी केली.